सुधारित विकास आराखड्यात रेडझोनची हद्द दर्शवली   

पिंपरी, : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन सुधारित विकास आराखड्यात (डीपी प्लॅन) रेडझोनची हद्द लाल रेषेत दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे रेडझोन हद्दीत आलेल्या भागांतील रहिवाशांना बांधकाम परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
महापालिकेच्या १९९७ च्या विकास आराखड्यात रेडझोन क्षेत्र दर्शविण्यात आले नव्हते. मात्र, महापालिकेने नुकताच प्रसिद्ध केलेल्या आराखड्यात रेड झोनची सीमा अधोरेखित केली आहे. आराखड्यात निगडी परिसरातील अप्पू घर, वाहतूकनगरी, सिद्धिविनायकनगरी, सेक्टर क्रमांक २०, २१, २२, २६ चा भाग तसेच निगडी गावठाणचा काही परिसर, यमुनानगरचा काही भाग रेडझोनमध्ये दाखविण्यात आला आहे. तळवडे, रुपीनगरचा भागही या झोनमध्ये आहे. 
भोसरी परिसरातील दिघी मॅग्झीन, सीएमई तसेच सांगवी, पिंपळे गुरव व पिंपळे निलख या परिसरातील लष्करी छावण्या व आस्थापना आहेत. विकासनगर, देहूरोड, रावेत, प्राधिकरण, निगडी, तळवडे हा भाग देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीच्या लगत आहे. मात्र, रेडझोनचा अधिकृत नकाशा अद्याप महापालिकेने प्रसिद्ध केलेला नाही.
 
दरम्यान, रेडझोन बाधित सीमांकन कायम केल्यास त्या भागांतील नवीन बांधकामांना बांधकाम परवाने बंद होतील. ज्यांनी प्राधिकरणाकडून जमिनी घेतल्या आहेत, गृहप्रकल्प उभारले आहेत, त्यांना पुनर्विकास करता येणार नाही. ज्यांनी बांधकामे सुरू करण्याचे दाखले घेतले आहेत, त्यांना पुढील बांधकाम परवाने मिळणार नाहीत. 
 
त्यामुळे शेकडो प्रकल्प थांबतील. विकास रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांना घर व जागेची विक्री करता येणार नाही. त्याला योग्य तो मोबदला मिळणार आहे. बांधकाम करण्यासाठी किंवा घर खरेदीसाठी बँक कर्ज प्रकरणे होणार नाहीत, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.
 

Related Articles